मुंबई: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारासाठी आजचा दिवस खराब ठरला आहे. संकटं एकाचवेळी उभी ठाकतात असं म्हणतात. पुजाराच्या बाबतीत हेच होताना दिसत आहे. श्रीलंकेच्या विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. कर्णधार म्हणून रोहित शर्माचं नाव जाहीर झालं. मात्र या संघात चेतेश्वर पुजाराला स्थान नाही.
राहुल द्रविडनंतर तिसऱ्या क्रमांकावरील भारताचा भरवशाचा फलंदाज ही पुजाराची ओळख. आपल्या अनेक खेळींनी त्यानं ही ओळख निर्माण केली. संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढलं. त्यामुळे त्याला संकटमोचक म्हटलं जातं. मात्र आता पुजाराच संकटात सापडला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड झालेली नाही. त्याच्यासोबत अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि ऋद्धिमान साहा यांनादेखील संघात जागा देण्यात आलेली नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज संध्याकाळी झाली. बीसीसीआयनं या संघात पुजाराला स्थान दिलं नाही. पुजारासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्याआधी ६ तासांपूर्वी पुजाराला आणखी धक्का बसला होता. सध्या रणजी स्पर्धेत खेळत असलेल्या पुजाराला भोपळाही फोडता आला नाही. सौराष्ट्रकडून खेळत असलेल्या पुजाराला मुंबईच्या मोहित अवस्थी शून्यावर माघारी धाडलं. अवघ्या ४ चेंडू खेळून पुजारा बाद झाला. विशेष म्हणजे अवस्थी पहिलाच प्रथमश्रेणी सामना खेळत होता. पदार्पणातच त्यानं पुजाराची विकेट काढली.