Cheteshwar Pujara, IND vs BAN Test: भारताने २०२२च्या शेवटच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा २-० असा पराभव केला. टीम इंडियाने बांगलादेशला त्यांच्या घरी पराभूत केल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर जल्लोष केला. यासोबतच प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर चेतेश्वर पुजाराने मुलाखत दिली, तेव्हा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्यासोबत थोडीशी मस्करी केली. मोहम्मद कैफने पुजाराला अतिशय मजेशीर पद्धतीने 'किसिंग'चा सल्ला दिला.
चेतेश्वर पुजाराला त्याच्या फॉर्म आणि शतकाबद्दल विचारण्यात आले. या दरम्यान मोहम्मद कैफने चेतेश्वर पुजारासोबत मस्करी केली. कैफ म्हणाला की, तू सतत धावा करत आहेस पण जेव्हा तू शतक पूर्ण करतोस तेव्हा तू खूप साधे सेलिब्रेशन करतोस. शतक झाल्यानंतर तू जरा फक्त बॅट हवेत खेळवत जा, कारण त्याची दृश्य टीव्हीवर दिसत राहतातच आणि अशा स्थितीत पुजारा धावा करत असल्याचे लोकांना नक्कीच लक्षात राहते. तुला तर यावेळी मालिकावीराचा किताब आणि ट्रॉफी मिळाली आहे. जरा त्या ट्रॉफीला किस कर, त्या चुंबनाचा फोटो फोटो सोशल मीडियावर टाक आणि आणखी वाहवा मिळव. कैफच्या या अजब सल्ल्यानंतर चेतेश्वर पुजारा काहीच बोलला नाही पण तो अतिशय खळखळून हसला.
विशेष म्हणजे, चेतेश्वर पुजाराने बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत केवळ २ सामन्यात २२२ धावा केल्या आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्या नावावर एक शतक आणि एक अर्धशतक होते. पुजाराच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत ९८ कसोटी सामन्यांमध्ये ७ हजार १४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४५च्या आसपास आहे आणि त्याने आतापर्यंत १९ कसोटी शतके झळकावली आहेत.