Cheteshwar Pujara in the County Championship 2022 - दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर BCCIने कसोटी संघात आता स्थान नाही, असा थेट इशारा दिला. कामगिरी दाखव तरच संघात पुन्हा संधी मिळेल, असे सांगितल्यानंतर चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) रणजी करंडक स्पर्धा खेळला. पण, त्यातही त्याला फार काही खास करता आले नाही. त्यामुळे आता पुढे काय, या प्रश्नाचं उत्तर शोधत तो कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत दाखल झाला. इथे ससेक्स ( Sussex) क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुजाराला जणू नवसंजीवनी मिळाली. ७ डावांमध्ये त्याने दोन द्विशतकं व दोन शतकी खेळी करताना BCCIला जणू I Am Back असे ठणकावून सांगितले.
ससेक्स विरुद्ध मिड्लेसेक्स यांच्यातल्या सामन्यात पुजाराने फॉर्म कायम राखला. ससेक्सने पहिल्या डावात ३९२ धावा करून मि़ड्लेसेक्स क्लबचा पहिला डाव ३५८ धावांवर गुंडाळला. पुजाराला पहिल्या डावात फक्त १६ धावाच करता आल्या. पण, दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना तो खंबीरपणे उभा राहिला. २ बाद ६ अशी संघाची अवस्था असताना पुजारा मैदानावर आला. त्याने टॉम अॅल्सोपसोबत ससेक्सच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. टॉम ६६ धावांवर माघारी परतला. पण, पुजाराने खिंड लढवली. चौथ्या विकेटसाठी त्याने टॉम क्लार्कसह १९१ धावा जोडल्या.
टॉम क्लार्क ७७ धावांवर माघारी परतला, तर पुजाराने १९७ चेंडूंत २२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १७० धावांची खेळी केली. ससेक्सने दुसरा डाव ४ बाद ३३५ धावांवर घोषित करून मिड्लेसेक्ससमोर ३७० धावांचे लक्ष्य ठेवले.
पुजाराने कौंटी चॅम्पियनशीपमध्ये यंदा ४ सामन्यांत दोन द्विशतकं व दोन शतकांसह १४३.४०च्या सरासरीने ७१७ धावा चोपल्या.
चेतेश्वर पुजाराची कामगिरी6(15)201*(387)109(206)12(22)203(334)16(10)170*(197)