नवी दिल्ली : देशात आयपीएलची धामधूम सुरू असताना इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा याची पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघात निवड झाली. गेल्यावर्षी स्थगित करण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धचा पाचवा व अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी पुजाराची कसोटी संघात निवड झाली आहे. हा सामना १ ते ५ जुलैदरम्यान खेळविण्यात येईल. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला मात्र डावलण्यात आले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिकची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.
बीसीसीआयने रविवारी इंग्लंड दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि ९ जूनपासून मायदेशात रंगणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार रोहित शर्मा, स्टार विराट कोहली, हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी मोहम्मद शमी यांना मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये आपल्या तुफानी वेगाने सर्वांना प्रभावित केलेल्या उमरान मलिकची भारताच्या टी-२० संघात निवड झाली. त्याच्यासह डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज अर्शदीप सिंग याचीही संघात वर्णी लागली आहे. त्याचप्रमाणे, यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे जबरदस्त नेतृत्व करताना आपली अष्टपैलू क्षमता सिद्ध केलेल्या हार्दिक पांड्याचेही भारतीय टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. आरसीबीकडून यंदाच्या सत्रात शानदार कामगिरी करत सर्वोत्तम फिनिशर ठरलेला दिनेश कार्तिक याचेही भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.
- रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ १५ जूनला इंग्लंडला रवाना होणार असून सध्या इंग्लंडमध्ये असलेला चेतेश्वर पुजारा तिथेच भारतीय संघासोबत जुळेल.
रहाणेची कारकीर्द संपली?
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची भारतीय संघात वर्णी लागली नाही. याआधी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला भारतीय संघातून बाहेर बसविण्यात आले होते. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो अखेरचा भारतीय संघातून खेळला होता. दुसरीकडे, पुजाराने कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत पुनरागमन केले असल्याने आता रहाणेच्या कारकिर्दीवर प्रश्न निर्माण होत आहेत.
भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, के. एस. भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
भारतीय टी-२० संघ
लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप-कर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
टी-२० मध्ये राहुलकडे नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यानंतर लोकेश राहुल याच्याकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले. तसेच. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडेल.