cheteshwar pujara । नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. 17 तारखेपासून या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. आगामी सामना भारताचा आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी खास असणार आहे. कारण हा सामना पुजाराच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळल्या जाणार्या चारही कसोटी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (world test championship) भाग आहेत. भारतीय संघाला अद्याप यंदाच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने जिंकावे लागतील, त्यानंतरच भारतीय संघ ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यात भाग घेऊ शकेल.
WTC फायनल जिंकणे हे स्वप्न आहे - पुजारा
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी चेतेश्वर पुजाराला त्याच्या स्वप्नाबद्दल विचारण्यात आले असता त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. सामन्याच्या तोंडावर झालेल्या पत्रकार परिषदेत पुजाराने म्हटले, "अजून खूप काही साध्य करायचे आहे. हा 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मी निश्चितच समाधानी आणि खरोखरच उत्साहित आहे. पण त्याचबरोबर आम्ही एक महत्त्वाची मालिका देखील खेळत आहोत. त्यामुळे आशा आहे की आम्ही हा कसोटी सामना जिंकू आणि त्यानंतरचा आणखी एक कसोटी सामना जिंकू ज्यामुळे आम्ही WTC फायनलसाठी पात्र ठरू. भारतीय संघासाठी WTC फायनल जिंकण्याचे माझे स्वप्न आहे, जे आधीच्या फायनलमध्ये झाले नव्हते. पण आशा आहे की एकदा आम्ही पात्र झालो की आम्ही त्या दिशेने वाटचाल करू."
100 व्या कसोटी सामन्याबाबत कधीच विचार केला नव्हता - पुजारा
"जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझे कसोटी पदार्पण केले तेव्हा मी 100 कसोटी सामने खेळण्याचा विचारही केला नव्हता. मी याबाबत कधीच विचार केला नव्हता. त्यामुळे ही मालिका सुरू होण्यापूर्वी मी विचार केला आणि नंतर मला समजले की मी माझा 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. करिअरमध्ये तुम्ही नेहमीच चढ-उतारांमधून जात असता आणि त्या स्थितीतून तुम्हाला बाहेर यावे लागते. मी 100 कसोटी सामने खेळेन असे कधीच वाटले नव्हते कारण ते माझे ध्येय नव्हते. मी नेहमीच एक असा खेळाडू आहे ज्याला प्रत्येक कसोटी सामन्यात आणि मालिकेत चांगली कामगिरी करायची असते."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Cheteshwar Pujara said before the second Test against Australia that it is my dream to see India win the final of the World Test Championship
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.