नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या धरतीवर आपल्या आक्रमक खेळीने गोलंदाजांना घाम फोडत आहे. त्याने रॉयल लंडन वन-डे कपमध्ये आक्रमक शतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. नेहमी शांत आणि संयमी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराने आक्रमक पवित्रा दाखवून गोलंदाजांचीच चांगलीच परीक्षा घेतली. एका षटकात २२ धावा ठोकून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असल्याचे त्याने संकेत दिले आहेत. ससेक्सच्या (Sussex) संघाकडून खेळताना पुजाराने ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केवळ ७९ चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी केली.
चेतेश्वर पुजारा सध्या शानदार लयनुसार खेळत आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिप २ मध्ये संघासाठी पहिल्यांदाच ५ शतके झळकावली होती. यामुळेच संघाच्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थित संघाची धुरा पुजाराकडे सोपवण्यात आली होती. संघाचा नियमित कर्णधार टॉम हॅन्स दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. पुजाराने शुक्रवारी झालेल्या वॉर्कशायरविरूद्धच्या सामन्यात ताबडतोब फलंदाजी करून शतक ठोकले.
पुजाराची झुंज अयशस्वी
या सामन्यात ससेक्सचा संघ ३११ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करत होता. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावातील २२ व्या षटकात २ बाद ११२ अशी धावसंख्या असताना खेळपट्टीवर आला होता. ससेक्सच्या ( Sussex) संघाचा कर्णधार असलेल्या पुजाराने केवळ ७३ चेंडूत शतक ठोकले. या सामन्यात लियाम नॉरवेलच्या एकाच षटकात पुजाराने २२ धावा खेचून आणल्या आणि संघाने विजयाकडे कूच केली. मात्र पुजाराच्या या ताबडतोब खेळीनंतर देखील पदरी निराशा पडली. ससेक्सच्या संघाला फक्त ४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात ससेक्सकडून क्रुणाल पांड्याने देखील गोलंदाजीतून कमाल केली आणि केवळ ५१ धावा देऊन ३ फलंदाजांना तंबूत पाठवले.
Web Title: Cheteshwar Pujara scored 107 runs off just 79 balls for Sussex
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.