भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी संघात स्थान न मिळालेल्या चेतेश्वर पुजाराने दुलिप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत खणखणीत शतक झळकावले आहे. पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग या लढतीत पुजाराच्या शतकाने पश्चिम विभागाला फ्रंटसीटवर बसवले आहे. सूर्यकुमार यादवनेही पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. पण, ज्या सर्फराज खानवरून भारतीय निवड समितीवर जोरदार टीका झाली, त्याने दोन डावांत ० व ६ अशी कामगिरी केली. पश्चिम विभागाने सध्याच्या घडीला ३५२ धावांची आघाडी घेतली आहे.
पश्चिम विभागाला पहिल्या डावात काही खास करता आले नाही. ए सेठ ( ७४) आणि डी जडेदा ( ३९) यांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी २२० धावांपर्यंत मजल मारली. पुजाराने पहिल्या डावात २८ धावा केल्या, तर सूर्यकुमार ७ धावांवर बाद झालेला. मध्य विभागाकडून शिवम मावीने ४४ धावांत ६ विकेट्स घेत कमाल केली. पण, त्याच्या मेहनतीवर पाणी फिरले. मध्य विभागाचा पहिला डाव १२८ धावांत गडगडला. ए नाग्वस्वालाने ५, सेठने ३ आणि तेजाने २ विकेट्स घेतल्या. पश्चिम विभागाकडून खेळणारा पृथ्वी शॉ ( १५) दुसऱ्या डावातही फेल गेला. कर्णधार प्रियांक पांचाळने १५ धावा केल्या.
चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यांनी डाव सारवला. सूर्यकुमार ५८ चेंडूंत ५२ धावा करून माघारी परतला. सर्फराज ६ धावांवर बाद झाला. पुजारा २३१ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने १०५ धावांवर खेळतोय अन् पश्चिम विभागाच्या ७ बाद २६२ धावा झाल्या आहेत.