Join us

Cheteshwar Pujara Pm Modi: है तैयार हम! चेतेश्वर पुजारा खेळणार १००वी कसोटी, पंतप्रधान मोदींकडून मिळाल्या खास शुभेच्छा

पंतप्रधान मोदींची भेट घेणं सन्मानाची गोष्ट, पुजाराने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 09:25 IST

Open in App

Cheteshwar Pujara Pm Modi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेत आघाडी वाढवण्याच्या दृष्टीने दिल्लीत होणारी कसोटी भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पण भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी ही कसोटी जास्त खास असण्याचे आणखी एक मोठे कारण आहे. हा सामना त्याच्या कारकिर्दीतील १०० वी कसोटी असणार आहे. जागतिक क्रिकेटमधील फार कमी खेळाडूंनी १०० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. पुजारा आता लवकरच त्या यादीत सामील होणार आहे. त्यातही विशेष म्हणजे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पुजाराचे पंतप्रधान मोदींकडून आधीच अभिनंदन करण्यात आले आहे.

१०० व्या कसोटीपूर्वी पुजारा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेला तेव्हा त्याला मोदींकडून विशेष शुभेच्छा मिळाल्या. त्यांनी १०० व्या कसोटीपूर्वी पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले- 'हे क्षण माझा उत्साह वाढवणारे आहेत. पंतप्रधान मोदींना भेटणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. या भेटीसाठी पंतप्रधान मोदी यांचे मन:पूर्वक आभार.'

१०० व्या कसोटीसाठी पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

चेतेश्वर पुजाराने या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा त्याने पंतप्रधानांच्या ट्विट रिट्विटही केले. पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले- पुजाराला भेटून खूप आनंद झाला. मी त्याला त्याच्या १०० व्या कसोटीसठी आणि कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

९९ कसोटी आणि चेतेश्वर पुजारा

पुजाराने आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यात ४४.१५ च्या सरासरीने ७ हजार २१ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतके आणि ३४ अर्धशतके सामील आहेत. पुजाराची ९९ कसोटीत नाबाद २०६ धावा ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. विशेष बाब म्हणजे पदार्पणापासूनच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने कसोटीत आतापर्यंत १५ हजार ७९७ चेंडूंचा सामना केला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियानरेंद्र मोदीचेतेश्वर पुजारा
Open in App