बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा चर्चेत आला आहे. अनेक दिवसांपासून टीम इंडियाबाहेर असणारा हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात असायला हवा, अशी चर्चा रंगत असताना तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फ्लाइट पकडणार असल्याची बातमी समोर आली आहे. जाणून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्टआधी समोर आलेल्या नव्या ट्विस्टसंदर्भातील खास गोष्ट
पुजारानं द्विशतकी खेळीसह ठोठावला होता टीम इंडियाचा दरवाजा, पण...
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा हा चौथ्या क्रमांकावर आहे. २०१८-१९ आणि २०२०-२१ या दोन्ही वेळी भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती. यात चेतेश्वर पुजारानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रणजी स्पर्धेत चेतेश्वर पुजारानं द्विशतक झळकावून पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले. पण त्याला या दौऱ्यात काही संधी मिळालीच नाही. पण आता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार हे फिक्स झाले आहे. पण यावेळी त्याची भूमिका पहिल्यापेक्षा एकदम वेगळी असेल.
बॅट बाजूला ठेवून पुजारा करणार 'बोलंदाजी'
पुजाराची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेती आकडेवारी कमालीची आहे. पण यावेळी तो बॅट बाजूला ठेवून हातात माइक घेऊन चाहत्यांना आपली नवी झलक दाखवणार आहे. हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये त्याची एन्ट्री झाली आहे. मैदानात संयमी बॅटिंगची कमाल दाखवल्यानंतर आता तो 'बोलंदाजी' करत चाहत्यांसोबत कनेक्ट होणार आहे.
DK चा पॅटर्न पुजारासाठीही लाभदायी ठरणार?
बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत फक्त ४ भारतीय असे आहेत ज्यांनी २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यात पुजाराचाही समावेश आहे. त्याच्याशिवाय या यादीत सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांचा समावेश होतो. टीम इंडियाबाहेर असताना कॉमेंट्री करत दिनेश कार्तिकनं याआधी संघात कमबॅक करून दाखवलं होते. चेतेश्वर पुजाराही असाच डाव खेळणार का? तो भारतीय कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवणार का? ते पाहण्याजोगे असेल.