Cheteshwar Pujara Century Surrey vs Sussex : इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट गाजवल्यानंतर भारताच्या कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा Royal London One-Day Cup स्पर्धेत धुमाकूळ घालतोय. ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या पुजाराने आज सरे क्लबच्या गोलंदाजांना इंगा दाखवला अन् स्पर्धेतील सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. या स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावताना पुजाराने List A क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. शतकासाठी १०४ चेंडू खेळल्यानंतर पुजाराने गिअर बदलला व पुढील २७ चेंडूंत ७४ धावा चोपल्या. त्याने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
पुजाराचे यंदाच्या इंग्लिश सत्रातील हे सातवे शतक ठरले. त्याने कौंटी क्रिकेटमध्ये ५ व आता वन डे क्रिकेटमध्ये दोन शतक झळकावली आहेत. प्रथम फलंदाजी करताना सरेच्या गोलंदाजांचा पुजारा व टॉम क्लार्क यांनी समाचार घेतला. या दोघांनीही शतक झळकावली. हॅरीसन वॉर्ड ( ५) व अली ओर ( ४) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर पुजारा व क्लार्क यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली. क्लार्क १०६ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने १०४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजाराने १०४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने शतक पूर्ण केले.
पुजाराच्या खेळीच्या जोरावर ससेक्सने ६ बाद ३७८ धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी सरेचा संपूर्ण संघ ३१.४ षटकांत १६२ धावांत माघारी पाठवून २१६ धावांनी विजय मिळवला.