Join us  

‘ससेक्स’ संघाबरोबरचा चेतेश्वर पुजाराचा करार संपुष्टात

डावखुरा फलंदाज ह्यूज पुढील सत्रात सर्व चॅम्पियनशिप आणि टी-२० व्हिटॅलिटी ब्लास्ट सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 6:11 AM

Open in App

लंडन : भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा पुढील वर्षीच्या काउंटी चॅम्पियनशिपसाठी ससेक्स संघात परतणार नाही. कारण, इंग्लिश क्लबने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल ह्यूजेसची सेवा कायम ठेवण्यासाठी पुजाराला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डावखुरा फलंदाज ह्यूज पुढील सत्रात सर्व चॅम्पियनशिप आणि टी-२० व्हिटॅलिटी ब्लास्ट सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

वेस्ट इंडिजचा उजवा हात वेगवान गोलंदाज जेडेन सील्स हा चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काउंटी संघाकडून खेळणार असल्याचेही क्लबने जाहीर केले. पुजारा २०२४मध्ये सलग तिसऱ्यांदा ससेक्सकडून खेळला होता. ह्यूजच्या पुनरागमनाआधी त्याने सात चॅम्पियनशिप सामने खेळले आहेत. ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक पाॅल फारब्रेस यांनी सांगितले की, चेतेश्वरसोबतचा करार संपुष्टात आणणे सोपे नव्हते; पण डॅनियल ह्यूज आमची गरज पूर्ण करतो.

पुढील सत्रासाठी तो उपलब्ध असणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. ह्यूजने यावर्षी ब्लास्टच्या साखळी फेरीत ४३.७च्या सरासरीने ५६० धावा केल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९६ आहे. सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या सत्रातील उर्वरित पाच सामन्यांमध्ये खेळण्यास तो उपलब्ध असणार आहे.

टॅग्स :चेतेश्वर पुजारा