कोलकाता - श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीसाठी मैदानात उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कसोटी सामन्यात पाचही दिवशी फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा जगातील नववा तर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेतेश्वर पुजाराच्या आधी एम एल जयसिम्हा आणि रवी शास्त्री यांनी हा रेकॉर्ड केला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे जयसिम्हा यांनीही कोलकातामध्येच हा रेकॉर्ड केला होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना त्यांनी पाचही दिवशी फलंदाजी केली होती. दुसरीकडे रवी शास्त्री यांनी 1984 मध्ये इडन गार्डन्स मैदानावर इंग्लंडविरोधात खेळताना पाचही दिवस फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले होते.
श्रीलंकेविरोधात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथा दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला होता. शिखर धवन 94 धावांवर आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानावर आला होता. चेतेश्वर पुजारा दोन धावा करत नाबाद राहिला होता. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा भारताकडून सर्वात जास्ता धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 52 धावा केल्या होत्या.
कोलकाता कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी पावसामुळे उशीर झाल्या कारणाने फक्त 11.5 ओव्हर्स खेळल्या गेल्या होत्या. यावेळी पुजारा 8 धावा करत नाबाद राहिला होता. दुस-या दिवशीही पुजारा 47 धावा करत नाबाद राहिला होता. तिस-या दिवशी 52 धावांवर तो आऊट झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना त्याला फलंदाजी कऱण्याची संधी मिळाली. चौथ्या दिवशी पुजारा दोन धावा करत नाबाद राहिला. यानंतर जेव्हा सोमवारी फलंदाजी करण्याठी मैदानावर उतरला तेव्हा कसोटी सामन्यात सलग पाच दिवस फलंदाजी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला.
भारताने कोलकाता कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात फक्त 172 धावात ऑल आऊट झालेला भारतीय संघाने दुस-या डावात एक विकेट गमावत 171 धावा केल्या. याआधी श्रीलंका संघ 294 धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 4-4 तर उमेश यादवने दोन विकेट्स घेतल्या.
कसोटीत पाचही दिवस फलंदाजी करणारे 9 फलंदाज कोण ?1) एम एल जयसिम्हा (भारत) 2) जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड) 3) किम ह्यूज (ऑस्ट्रेलिया) 4) एलन लंब (इंग्लंड) 5) रवी शास्त्री (भारत) 6) एड्रियन ग्रिफीथ (वेस्ट इंडीज) 7) अँड्रूयू फ्लिंटॉफ (इंग्लंड) 8) एल्विरो पीटरसन (दक्षिण आफ्रिका) 9) चेतेश्वर पुजारा (भारत)