Join us  

चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार, डब्ल्यूटीसी फायनल

WTC final : पार्थिवने क्रिकेट कनेक्ट या कार्यक्रमात सांगितले की,‘भारताला या सामन्यात विजय मिळविण्यासाठी पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे लागेल. जर पुजाराने खेळपट्टीवर ३-४ तास व्यतित केले, तर भारतीय संघ चांगल्या स्थितीत येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:35 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘न्यूझीलंडविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराची भूमिका भारतासाठी महत्त्वाची ठरेल. या ऐतिहासिक अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पुजारा सर्वाधिक धावा काढण्यात यशस्वी ठरेल,’ असा विश्वास भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेल याने व्यक्त केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ जूनपासून साऊदम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना रंगेल.पार्थिवने क्रिकेट कनेक्ट या कार्यक्रमात सांगितले की,‘भारताला या सामन्यात विजय मिळविण्यासाठी पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे लागेल. जर पुजाराने खेळपट्टीवर ३-४ तास व्यतित केले, तर भारतीय संघ चांगल्या स्थितीत येईल. या सामन्यात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून मी पुजाराला पसंती देईन.’ विराट कोहली मजबूत फलंदाजीसह दमदार गोलंदाजीच्या जोरावर हा अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वासही पार्थिवने व्यक्त केला. 

‘क्रिकेट ज्ञान एका बाजूला ठेवून मी या सामन्यात संभाव्य विजेता म्हणून भारतीय संघाला समर्थन देईन. माझ्या मते, भारतीय गोलंदाजी आक्रमणात मोहम्मद शमीची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्याने सर्वच परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.’ - पार्थिव पटेल

‘डब्ल्य यूटीसी अंतिम सामना आतापर्यंतचा सर्वात मोठा कसोटी सामना आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे पारडे काहीसे वरचढ असल्याचे माझे मत आहे. तसेच या सामन्यात केन विलियम्सन सर्वाधिक धावा काढेल आणि ट्रेंट बोल्ट किंवा शमी यांच्यापैकी एक सर्वाधिक बळी घेईल, असे मला वाटते.’      - इरफान पठाण

‘सामना कोण जिंकणार हे सांगणे कठीण आहे, मात्र न्यूझीलडं संभाव्य विजेता म्हणून सामन्याला सुरुवात करेल. सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये माझी पसंती विराट कोहलीला असेल.’      - अजित आगरकर

‘इंग्लंडविरुद्ध पदार्पण करणारा डेवोन कॉनवे आणि बोल्टच्या जोरावर न्यूझीलंड बाजी मारेल.’     - स्कॉट स्टायरिस

टॅग्स :चेतेश्वर पुजारा