मुंबई : तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्ही स्ट्रगलचे दिवस विरसत नाहीत. अशीच एक गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेच्या युवा वेगवान गोलंदाजाची. लहानपणी त्याने भरपूर गरीबी पाहिली. पण त्याने क्रिकेटचे वेड जोपासले आणि आता क्रिकेट विश्वात श्रीमंती कमावली आहे. हा दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज आहे लुंगी एनगिडी.
सध्याच्या घडीला जगातील अव्वल वेगवान गोलंदाजांमध्ये एनगिडीचे नाव घेतले जाते. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पण आता क्रिकेटमध्ये नावलैकिक कमावल्यावरही तो आपले जुने दिवस विसरलेला नाही.
एनगिडी म्हणाला की, " लहानपणी आमच्या घरात भरपूर गरीबी होती. मला क्रिकेट खेळायची आवड होती. पण मला घरातून क्रिकेटचे कोणतेच साहित्य मिळणार नाही, हे मला चांगलेच माहिती होते. त्यामुळे मी घरच्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना ते जुने दिवस कधी कधी नक्कीच आठवतात."
एनगिडी पुढे म्हणाला की, " हा खेळ सर्वस्व आहे. कारण हा खेळ तुम्हाला तुमची खरी जागा दाखवतो. तुम्ही जेव्हा मैदानात उतरता तेव्हा हा खेळ कोणताही भेद करत नाही. तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर तुम्ही नक्कीच चांगले क्रिकेट खेळू शकता आणि नाव कमावू शकता. त्यामुळे माझ्यासाठी हा खेळ माझी ओळख आहे."