बँकॉक : चीनच्या महिला क्रिकेट संघाने सोमवारी महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात नीचांक कामगिरीची नोंद केली. संयुक्त अरब अमिराती ( युएई) संघाविरुद्ध थायलंड महिला ट्वेंटी-20 स्मॅश स्पर्धेत चीनचा संपूर्ण संघ अवघ्या 14 धावांवर तंबूत परतला. युएई संघाने हा सामना 189 धावांनी जिंकला आणि महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला.
युएईच्या गोलंदाजांसमोर चीनच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. युएईच्या 3 बाद 203 धावांचा पाठलाग करताना चीनचा संघ फारकाळ खेळपट्टीवर टिकला नाही. या मानहानिकारक पराभवानंतर चीनने स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला. याआधी ऑगस्ट 2018 मध्ये त्यांना नामिबियाकडून 179 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
युएईच्या इर ओझाने 62 चेंडूंत 82 धावा चोपल्या. तिला मधल्याफळीत छाया मुघल ( 33 आणि एन डी'सुजा ( 26) यांची उत्तम साथ लाभली. युएईची ही महिला ट्वेंटी-20 मधील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. फलंदाजीपाठोपाठ युएईच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी चीनच्या सात खेळाडूंना भोपळाही फोडू दिला नाही. झँग चॅन ( 2), झँग यानलिंग ( 3), हॅन लिली ( 4) आणि यिंग झोऊ (3) यांना धाव करता आली.