मुंबई : किंग्ज ईलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मधील प्ले ऑफच्या आपल्या आशा कायम राखताना सलग तिसरा विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) सहज नमवले. धावफलकावर नजर टाकल्यास निकोलस पूरनचे (Nicholas Pooran) आक्रमक अर्धशतक नक्कीच पंजाबसाठी मॅचविनिंग इनिंग दिसून येईल. मात्र या विजयाचा पाया रचला तो विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) याने. या तडाखेबंद फलंदाजाने आपणच टी-२० क्रिकेटचे खरे ‘बॉस’ असल्याचे यावेळी सिद्ध केले.
धवनच्या नाबाद शतकानंतरही दिल्लीला ५ बाद १६४ धावांत रोखल्यानंतर पंजाबने विजयी लक्ष्य १९व्या षटकातंच पार केले. लोकेश राहुल-मयांक अग्रवाल ही सलामी जोडी अपयशी ठरल्यानंतर ख्रिस गेल व पूरन यांनी पंजाबच्या धावगतीला वेग दिला. गेलने १३ चेंडूंत २९ धावांचा तडाखा दिला. या जोरावर मिळालेला वेग पकडला तो पूरनने. त्याने २८ चेंडूंत ५३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनेही २४ चेंडूंत ३२ धावा फटकावल्या.
सध्या यूएईमध्ये तिन्ही स्टेडियम्समधील खेळपट्ट्या संथ होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये येथे आक्रमक फटके खेळणे फलंदाजांना काहीशे कठीण जात आहे. त्यातच दिल्लीच्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबला पॉवर प्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारणे अत्यंत आवश्यक होते. मात्र स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली राहुल-मयांक ही सलामी जोडी स्वस्तात परतल्याने पंजाबवर दडपण आले होते.
अशा परिस्थितीत सूत्रे सांभाळली ती गेलने. त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर दिल्लीच्या गोलंदाजांवर, विशेष करुन तुषार देशपांडेवर तुफानी हल्ला चढवत पंजाबच्या धावगतीला मोठा वेग दिला. हाच वेग नंंतर पकडला तो पूरनने आणि त्याने आक्रमक अर्धशतक झळकावता आवश्यक धावगती पंजाबच्या अवाक्यात आणली. त्यामुळेच गेलच्या फटकेबाजीमुळे मिळालेला वेग पंजाबसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि अच जोरावर पंजाबचा विजय सोपा ठरला. गेलचा हाच धडाक पाहून प्रतिस्पर्धी संघांवर दडपण आले आहे. गेलचा हा तडाखा असाच सुरु राहिला, तर पंजाबला प्ले आॅफ प्रवेशपासून रोखणे सर्वांनाच कठीण जाईल, हे नक्की.