Chris Gayle Bat broken Video : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. ख्रिस गेल टी-20 क्रिकेटमधला सर्वात धोकादायक फलंदाज मानला जातो. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये खेळताना दिसत नसला तरी वयाच्या ४४व्या वर्षीदेखील क्रिकेटच्या मैदानावरची त्याची जादू कमी झालेली नाही. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्याने मारलेल्या चौकाराच्या वेळी त्याची बॅट तुटल्याचे दिसून आले.
नक्की काय घडला प्रकार?
ख्रिस गेल लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळत आहे. सामन्यात ख्रिस गेलने असा चौकार मारला की त्याची बॅट तुटली. बुधवारी त्याच्या संघाचा सामना भिलवाडा किंग्जशी झाला. हा सामना रांचीमध्ये खेळला गेला. सहाव्या षटकात माजी इंग्लिश वेगवान गोलंदाज रायन साइडबॉटमच्या चेंडूवर गेलने जोरदार फटकेबाजी केली. चेंडू कव्हरवरून गेला आणि सीमारेषा ओलांडली, पण यादरम्यान गेलची बॅटच तुटली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
दरम्यान, या सामन्यात ख्रिस गेलने केवळ २३ चेंडूत अर्धशतक केले. एकेकाळी तो १८ चेंडूंत २६ धावांवर खेळत होता. पण त्यानंतर साइटबॉटमच्या षटकात त्याने सलग ५ चेंडूंवर २४ धावा केल्या. सुरूवातीला गेलने सलग दोन षटकार ठोकले. यानंतर त्याने सलग तीन चेंडूंवर तीन चौकार लगावले. या षटकात एकूण २५ धावा झाल्या. गेलने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्याला राहुल शर्माने LBW बाद केले. सामन्यात गेलच्या गुजरात जायंट्स संघाने ३ धावांनी सामना जिंकला.