हरारेः वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं पुन्हा एकदा आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन घडवून 'युनिव्हर्स बॉस' ही उपाधी सार्थ ठरवली आहे. वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत, स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात गेल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानं त्याचे चाहते नाराज झाले होते. पण, सामन्यानंतर गेलनं एक काम असं केलं की सगळ्यांचीच मन जिंकून घेतली.
ख्रिस गेलनं त्याची विकेट घेणाऱ्या स्कॉटलंडच्या गोलंदाजाला - सुफियान शरीफ याला आपली एक बॅट भेट म्हणून दिली आहे.
२०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडीजनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. पात्रता फेरीतील सुपर सिक्स सामन्यात विंडीजनं स्कॉटलंडचा पाच धावांनी पराभव केला. या सामन्यात ख्रिस गेलला भोपळाही फोडता आला नाही. तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि हरारेच्या मैदानावरील 'गोल्डन डक' त्याच्या नावावर नोंदलं गेलं. पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानं विंडीज थोडं अडखळलं. पण नंतर त्यांनी विजय साकारला.
या सामन्यानंतर जेव्हा गेल आणि सुफियान यांची भेट झाली, तेव्हा गेलनं त्याला आपली फेव्हरिट बॅट देऊन टाकली. गेलसारख्या विक्रमवीराकडून एवढी भारी भेट मिळाल्यानं सुफियानचा आनंद गगनात मावत नाहीए. त्यानं आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या.
Web Title: chris gayle gifted a bat to bowler who got his wicket on the first ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.