नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा घातक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) आगामी टी-20 विश्वचषकाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ पोहचणार नाही असा दावा गेलने केला आहे. ख्रिस गेलचे हे विधान भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या संधींशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात आले आहे. ख्रिस गेलच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
एका वृत्तपत्राशी संवाद साधताना ख्रिस गेलला भारतीय संघाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, "भारत टी-20 विश्वचषक जिंकण्याचा दावेदार आहे, पण वेस्ट इंडिजकडे त्यापेक्षा जास्त संधी आहेत." लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम सामना होईल असा दावा त्याने केला आहे. यासोबतच त्याने असेही म्हटले आहे की कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो यांसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत विंडीजच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यात नक्कीच काही अडचणी येतील पण संघ या अडचणींवर मात करेल.
टी-20 विश्वचषकात नाही खेळणार हे दिग्गजखरं तर ख्रिस गेल यावेळी वेस्ट इंडिजच्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग नाही. मागील वर्षीच्या विश्वचषकापासून तो विंडीज संघातून बाहेर आहे. लक्षणीय बाब म्हणजे मागील वर्षीच्या विश्वचषकात तो विशेष कामगिरी करू शकला नव्हता. आंद्रे रसेलही गेल्या टी-20 विश्वचषकापासून वेस्ट इंडिजकडून एकही सामना खेळलेला नाही. मात्र दोघांनीही अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. दुसरीकडे ड्वेन ब्राव्होने मागील टी-20 विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्याचवेळी कायरन पोलार्डने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
निकोलस पूरन करणार नेतृत्व वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषकात निकोलस पूरनच्या नेतृत्वात दिसणार आहे. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो आणि आंद्रे रसेलसारखे दिग्गज असूनही या संघात एकापेक्षा जास्त टी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांची फळी आहे. संघात फलंदाज, अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांचा चांगला मारा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र विंडीजचा संघ टी-20 क्रिकेटमध्ये मागील वर्षभरात काही खास कामगिरी करू शकला नाही.
सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"