बासेटेरे - बांगलादेशने अखेरच्या वन डेत वेस्ट इंडिजला 18 धावांनी हार मानण्यास भाग पाडले आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. वेस्ट इंडिजला मालिकेत पराभव पत्करावा लागला असला तरी तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 301 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 50 षटकांत 6 बाद 283 धावांपर्यंतच मजल मारता आली.
तमीम इक्बाल (103) आणि महमदुल्लाह (नाबाद 67) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने 6 बाद 301 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात सलामीवीर गेलने 66 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकार खेचून 73 धावांची खेळी केली, परंतु अन्य फलंदाजांकडून त्याला योग्य ती साथ लाभली नाही. गेलनंतर रोव्हमन पॉवेलने नाबाद 74 धावा करताना वेस्ट इंडिजच्या विजयासाठी संघर्ष केला. मात्र, त्याला अपयश आले.
या सामन्यात गेलने पाचवा षटकार खेचताच एक विक्रम नोंदवला. कसोटी, वन डे आणि टी-20 अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या 476 षटकारांच्या विक्रमाशी गेलने बरोबरी केली. आफ्रिदीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण 524 सामन्यांत 476 षटकार खेचले आहेत. गेलला हा विक्रम करण्यासाठी 443 सामने खेळावे लागले.