Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यानं नाव नोंदवलेलं नाही. १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे हा लिलाव होणार आहे. यंदापासून आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असल्यानं सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, या आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल हे दोन ट्वेंटी-२०चे सुपरस्टार दिसणार नाहीत. एबीनं मागच्याच महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात आज गेलनंही हा निर्णय घेतल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी ( लिलाव) १२१४ खेळाडूंनी ( ८९६ भारतीय व ३१८ परदेशी) नावं नोंदवली आहेत. यामध्ये २७० खेळाडू यांनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर ९०३ खेळाडू अनकॅप आणि ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेतील आहेत. पण, नोंदणी केलेल्या या खेळाडूंमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) याच्यासह मिचेल स्टार्क, सॅम कुरन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स या स्टार्सची नावं नाहीत. त्यामुळे आयपीएल २०२२मध्ये हे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.
ख्रिस गेलची आयपीएलमधील कामगिरी आयपीएलमध्ये ख्रिस गेल कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघाकडून खेळला. त्यानं आयपीएलमध्ये ३९.७२च्या सरासरीनं आणि १४८.९६ स्ट्राईक रेटनं ४९६५ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय आयपीएल इतिहासात सर्वाधिक ३५७ षटकार त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर असून त्यानं २०११ व २०१२ साली RCBकडून खेळताना ऑरेंज कॅप नावावर केली होती.