मुंबई : ख्रिस गेलने आतापर्यंत धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वामध्ये नाव कमावले आहे. मॅझान्सी सुपर लीग ट्वेंटी-20च्या सामन्यातही गेल चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. गेलने या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावले. या धमाकेदार फटेबाजीनंतर गेल मैदानाबाहेरही बरसल्याचे पाहायला मिळाले आहे. लीगमध्ये खेळणाऱ्या काही संघांवर त्याने गंभीर आरोप केले आहेत.
गेलने मॅझान्सी सुपर लीग ट्वेंटी-20च्या सामन्यात 27 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 54 धावा फटकावल्या. या फटकेबाजीनंतर गेल हा ट्वेन्टी-२० लीगमधील काही संघांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.
इएसपीएन-क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार गेल मैदानाबाहेर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर गेलने काही संघांवर गंभीर आरोपही केले आहेत.
या सामन्यानंतर गेल म्हणाला की, " जेव्हा ख्रिस गेल खेळत असतो तेव्हा त्याला डोक्यावर घेतले जाते. पण जेव्हा गेल २-३ सामन्यांमध्ये चांगली खेळी साकारत नाही तेव्हा तो संघासाठी ओझे होतो. ही गोष्ट मी या लीगमधील संघांबाबत बोलत नाही. पण गेले वर्षभर मी पाहत आलो आहे की, माझ्याबाबत या गोष्टी घडत आहे. "
ख्रिस गेल अन् एबी डिव्हिलियर्स यांची एकाच सामन्यात आतषबाजी; पाहा कोणी मारली बाजीख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हुकूमी फलंदाज... ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये तर या दोघांसमोर गोलंदाजांना टिकाव लागणे अवघडच.. त्यामुळे या दोन ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी सोडणं, म्हणजे अस्सल क्रिकेटची मेजवानीकडे पाठ फिरवण्यासारखे. त्यात हे दोन्ही फलंदाज एकमेकांविरुद्ध मैदानावर उतरले, तर ती क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणीच. रविवारी मध्यरात्री मॅझान्सी सुपर लीग ट्वेंटी-20च्या सामन्यात गेल व डिव्हिलियर्स समोरासमोर आले आणि दोघांच्या तुफान फटकेबाजीनं चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. आता जाणून घ्या यात कोणी बाजी मारली...
त्श्वाने स्पार्टन्स आणि जोझी स्टार्स यांच्यातल्या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना स्पार्टन्स संघानं 6 बाद 155 धावा चोपल्या. टी डी ब्रुयन्स ( 0) आणि व्हॅन डेर मर्व्ह ( 5) झटपट माघारी परतल्यानंतर स्पार्टन्सच्या मदतीला डिव्हिलियर्स धावून आला. त्यानं 33 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 53 धावांची खेळी केली. त्याला पिएट व्हॅन बिलजॉनची चांगली साथ लाभली. बिलजॉननं 29 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 45 धावा जोडल्या. स्टार्सकडून अॅरोन फंगिसो आणि डॅनीएल ख्रिस्टियन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 400वा सामना खेळणाऱ्या गेलनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. रिझा हेड्रीक्स (0) माघारी परतल्यानंतर स्टार्सच्या गेल व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. गेल 27 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 54 धावा करून माघारी फिरला. त्यापाठोपाठ बवुमाही 30 चेंडूंत 35 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मात्र स्पार्टन्सने सामन्यात कमबॅक केले आणि स्टार्सना लक्ष्यापासून दूर ठेवले. स्पार्टन्सने हा सामना 20 धावांनी जिंकला. त्यांनी स्टार्सचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत 135 धावांत माघारी पाठवला. स्पार्टन्सच्या टॉम कुरन ( 3/30), मॉर्ने मॉर्केल ( 3/21) आणि व्हॅन डेर मर्व्ह ( 2/11) यांनी उत्तम गोलंदाजी केली.