मुंबई: टी-२० क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज असलेल्या ख्रिस गेल (Chris Gayle) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळला नाही. मात्र त्याने संधी मिळाल्यानंतर प्रत्येक सामन्यात आपला तडाखा देताना किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या (Kings XI Punjab) सलग पाच विजयांमध्ये मोलाचे योगदान दिले. मात्र यानंतरही पंजाबचे आव्हान यंदाच्या सत्रातून सपुष्टात आले. संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर गेल निराश झाला. यानंतर त्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर भावनिक पोस्ट केली. या पोस्टद्वारे तो निवृत्त होत असल्याचे वाटल्याने सोशल मीडियावर गेलच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे.
युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखला जाणाऱ्या गेलची बॅट यंदाच्या सत्रात चांगलीच तळपली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले होते. गेलने यंदा ७ सामने खेळताना ४१.१४ च्या सरासरीने आणि १३७.१४ च्या स्ट्राईक रेटने २८८ धावा कुटल्या. त्याने ३ अर्धशतक झळकावताना ९९ धावांची सर्वोच्च खेळी केली.
पंजाब संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर गेलने ट्विट केले आणि चाहत्यांना मोठा धक्काच बसला. गेलने ट्विट केले की, ‘कृपया, आयपीएल बघत रहा. भलेही माझे सत्र संपले असले तरीही, धन्यवाद.’ गेलच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला. अनेकांनी गेल आता निवृत्त होणार असल्याचा अंदाज बांधत त्याला निवृत्त न होण्याचा सल्ला दिला. गेलच्या या ट्विटनंतर अनेकांना वाटले की, गेल आता आयपीएलमध्ये कधीही खेळताना दिसणार नाही. त्यामुळेच आता गेलच्या निवृत्तीबाबत चाहत्यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी गेलला दु:खी आणि निराश न होण्याबाबत सल्लाही दिला आहे.
चेन्नईविरुद्ध झालेला सामना पंजाबसाठी यंदाच्या सत्रातील अखेरचा सामना ठरला. हा सामना दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यातील पराभवाने पंजाबचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर गेल अत्यंत निराश झालेला दिसला आणि यामुळेच त्याने ट्वीटरवर भावनिक पोस्ट टाकली आहे.