मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत तुफान फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेलचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला. जुलै 2018 नंतर गेलने फेब्रुवारी 2019मध्ये विंडीजच्या वन डे संघात पुनरागमन केले. घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत गेलने इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांत 424 धावा चोपल्या आणि त्यात दोन शतकं व एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यामुळे त्याला वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले. आता गेलच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विंडीजच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात गेल उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे.
39 वर्षीय गेलने विंडीजचे 103 कसोटी, 289 वन डे आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18992 धावा आहेत. 2007 ते 2010 या कालावधीत गेलने तीनही स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये एकूण 90 सामन्यांत विंडीज संघाचे नेतृत्व सांभाळले होते.
जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कप उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गेल किंग्ल इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. या लीगमध्ये गेलने 13 सामन्यंत 153.60च्या स्ट्राईक रेटने 490 धावा चोपल्या आहेत. आयपीएलमुळे त्याला आयर्लंड येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेला मुकावे लागले आहे.
त्याच्या अनुपस्थितीत तिरंगी मालिकेत शाय होपकडे उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात होप आणि जॉन कॅम्बेल यांनी पहिल्या विकेटसाठी 365 धावांची विक्रमी भागीदारी केली.
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना 31 मे ला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.