Chris Gayle Power Hitting, LLC 2024: लेजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये काल गुजरात जायंट्स आणि कोणार्क सूर्याज यांमध्ये सामना रंगला. या सामन्यात कोणार्क सूर्याज संघाने ७ गडी आणि ५ षटके राखून विजय मिळवला. गुजरात जायंट्स संघाने सर्वप्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेल, शिखर धवन आणि देवाभ्रता दास यांच्या छोटेखानी खेळीच्या जोरावर २० षटकांमध्ये आठ बाद १४१ धावा केल्या. हे आव्हान कोणार्क सूर्याज संघाने दिलशान मुनवीरा आणि केविन ओब्रायन यांच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर १५ षटकांतच पार केले. सामन्यात ख्रिस गेल चा संघ हरला असला तरीही त्याने मैदानावर चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. गेलच्या खेळीचा एक छोटा व्हिडिओ लेजंड्स लीग क्रिकेटने पोस्ट केला आहे. तो व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून व्हायरल होत आहे.
ख्रिस गेलच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर मॉर्निंग व्हेन वीकची विकेट स्वस्तात गमावली. त्यानंतर शिखर धवन आणि ख्रिस गेल यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यावेळी गेलने ३० चेंडूत ३४ धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने फटकेबाजी करताना मध्येमध्ये मैदानावरूनच चाहत्यांशी हातवारे करत संवाद साधला. याच संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ख्रिस गेलची फटकेबाजी आणि चाहत्यांनी केलेला जल्लोष स्पष्टपणे दिसून येतो.
दरम्यान, गेल आणि शिखर धवन (२३) बाद झाल्यानंतर देवाभ्रता दास (२५) आणि सिकुगे प्रसन्न (३१) वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. या चौघांच्या खेळीमुळे संघाने १४१ चा टप्पा गाठला. प्रत्युत्तरात कोणार्क सूर्याज संघाकडून सलामीवीर रिचर्ड लेव्ही याने 25 धावा केल्या. त्यानंतर दिलशान मुनविरा (४७) आणि केविन ओब्रायन (नाबाद ४३) या दोघांनी दमदार खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेले. शेवटच्या टप्प्यात इरफान पठाणने सहा चेंडूत तीन षटकारांच्या साथीने नाबाद १९ धावा करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.