Join us  

ख्रिस गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्त, या देशात खेळणार अखेरचा सामना

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:13 AM

Open in App

कॅनबेरा : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.  इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या वन डे मालिकेत गेलला संघात स्थान देण्यात आले होते. पहिल्या दोन वन डे सामन्यासाठी तो विंडीज संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जुलै 2018नंतर तो राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या विंडीज संघाचा तो सदस्य नव्हता. अफगाणिस्तान प्रीमिअर लीग आणि टी-10 लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने राष्ट्रीय संघासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर गेलने केवळ 15 वन डे सामने खेळले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. किंगस्टन ओव्हल येथे पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. 39 वर्षीय गेल हा वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 284 वन डेत 9727 धावा केल्या आहे. सामन्यांच्या आणि धावांच्या बाबतीत दिग्गज ब्रायन लारा आघाडीवर आहे. त्याने 299 सामन्यांत 10405 धावा चौपल्या आहेत. मात्र, सर्वाधिक शतक करणाऱ्या विंडीज खेळाडूंमध्ये गेल (23) आघाडीवर आहे. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धची 215 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या नावावर 165 विकेट्सही आहेत.  वेस्ट इंडिजने पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावून 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिजइंग्लंडआयसीसी विश्वकप २०१९