नवी दिल्ली : धावांचा बकासुर म्हटला जाणारा ख्रिस गेल तब्बल 18 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात परतणार आहे. गेलचे संघात पुनरागमन हे वेस्ट इंडिजसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण आगामी विश्वचषक स्पर्धेत गेल खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल जुलै 2017मध्ये आपला अखेरचा सामना वेस्ट इंडिजसाठी खेळला होता.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजला आता एकदिवसीय मालिका जिंकायची असल्यामुळे गेलचे पुनरागमन त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि काही नामांकित खेळाडूंमध्ये वाद झाले होते. त्यानंतर गेल बऱ्याचदा संघाबाहेर होता. क्रिकेट विश्वातील वेगवेगळ्या लीगमध्ये तो खेळत असल्यामुळे त्याने देशाकडून खेळण्यास प्राधान्य दिले नव्हते. पण आता आयपीएल आणि त्यानंतर होणारी विश्वचषक स्पर्धा गेलला खेळायची आहे. या स्पर्धांसाठी आपली चांगली तयारी व्हावी, म्हणून गेल वेस्ट इंडिजच्या संघात परतला असल्याचे म्हटले जात आहे.