Universe Boss ख्रिस गेलनं ( Chris Gayle) आज ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अश्यक्यप्राय विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० षटकार ( Sixes) खेचणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. दुसऱ्या स्थानावर असलेल्या किरॉन पोलार्डच्या खात्यात ६९० षटकार आहेत. म्हणजे गेलच्या आसपासही कुणी नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गेलनं ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकार मारून ९९ धावा केल्या. ट्वेंटी-20त सर्वाधिक २२ शतकं नावावर असलेल्या गेलला कारकिर्दीत दोनदा ९९ धावांवर समाधान मानावे लागले. अर्थात त्याच्या आजच्या खेळीला पराभवाचे तोंड पहावे लागले. राजस्थान रॉयल्सनं ७ विकेट्स राखून किंग्स इलेव्हन पंजाबला पराभूत केले.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात ५+ षटकार मारण्यात गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्यानं २९ वेळा हा पराक्रम केला. एबी डिव्हिलियर्स ( १८), किरॉन पोलार्ड ( १२), शेन वॉटसन ( ११) व रोहित शर्मा ( १०) यांचा क्रमांक येतो. 2013मध्ये त्यानं RCBकडून खेळताना पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध नाबाद 175 धावा चोपल्या होत्या आणि त्यात 17 चौकारांची आतषबाजी केली होती. ट्वेंटी-20त एका सामन्यात सर्वाधिक 18 षटकाराचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. पण, त्यानं हा विक्रम बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये केला होता.IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्येही गेल ३४९ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्स ( 232 षटकार) आणि महेंद्रसिंग धोनी ( 216) यांचा त्याच्यानंतर क्रमांक येतो.
ख्रिस गेलनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकूण १३,५७२ धावा चोपल्या आहेत आणि त्यात षटकार ( ६००६) आणि चौकार ( ४१६४) यातून आलेल्या धावा या १०१७० आहेत. म्हणजेच कारकिर्दीतील एकूण धावांपैकी ७४.९३% धावा या त्यानं चौकार व षटकार खेचून केल्या आहेत.
दरम्यान, ख्रिस गेलच्या ( Chris Gayle) फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर ( Rajasthan Royals) तगडं आव्हान उभं केलं. पण, बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि RRच्या सर्व फलंदाजांनी सांघिक खेळ करताना संघाचा विजय पक्का केला. KXIPची विजयी घोडदौड रोखून RRनं स्वतःचं स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता प्ले ऑफच्या उर्वरित तीन जागांसाठीची चुरस अधिक रंजक झाली आहे.