युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यानं आयपीएल २०२१चं बायो बबल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१मध्येपंजाब किंग्सच्या प्ले ऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत आणि अशात गेलच्या या निर्णयानं त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्स ११ सामन्यांत ४ विजयांसह ८ गुणांची कमाई करून सहाव्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं १८ गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला आहे. दिल्ली कॅपिटल्स ( १६) व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( १४) हे प्ले ऑफ प्रवेशद्वारावर आहेत आणि चौथ्या संघासाठी पंजाबसह मुंबई इंडियन्स ( १०), कोलकाता नाइट रायडर्स ( १०) व राजस्थान रॉयल्स ( ८) शर्यतीत आहेत. अशाच गेलची माघार घेणं पंजाबसाठी डोकेदुखी ठरू शकते.
आयपीएल २०२१त गेलला अद्याप आपली छाप पाडता आली नाही, १० सामन्यांत त्यानं केवळ १९३ धावा केल्या आहेत. ४६ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पण, त्याची अनुपस्थिती PBKSला मानसिक धक्का देणारी ठरू शकते. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात ४२ वर्षीय गेलचा समावेश केला गेला आहे. आयपीएल २०२०पासून तो सतत कोणत्या ना कोणत्या बायो बबलमध्ये आहे. तो वेस्ट इंडिज संघासोबत श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही खेळला होता. त्यानंतर लगेचच तो २०२१च्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळला. सततच्या बायो बबलमधून थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी त्यानं हा निर्णय घेतला आहे.
१७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मानसिक दृष्ट्या तंदुरूस्त ठेवण्यासाठी त्यानं बायो बबलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.