कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. स्पर्धाच होत नसल्यानं अनेक संघटनांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे त्यांना खेळाडूंच्या मानधनात कपात करावी लागत आहे. इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट आहे. यातच कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL) 2020च्या मोसमात जमैकन थलायव्हास संघानं वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेलला संघात कायम न राखण्याचा निर्णय घेतला. पण, त्याच्या मदतीला आयपीएलमधील संघ किंग्स इलेव्हन पंजाब धावला आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मालकी हक्क असलेल्या KPH Dream Cricket Private Limited संघानं फेब्रुवारी 2020मध्ये सेंट ल्युसिया झोऊक्स संघ खरेदी केला आणि त्यांनी अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली. आयपीएलमध्ये गेल पंजाब संघाकडून खेळत आहे. जमैकन संघानं गेलसोबतचा करार रद्द केल्यानतंर सेंट ल्युसिया संघानं गेलला आपल्या ताफ्यात दाखल केले. CPLच्या यंदाच्या मोसमात गेल सेंट ल्युसिया संघाकडून खेळताना दिसणार आहे. CPLच्या पहिल्या चार मोसमात गेल जमैकन संघाकडून खेळला. तत्पूर्वी त्यानं दोन मोसम सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाचे प्रतिनिधित्व केले. गतवर्षी तो पुन्हा जमैकन संघाचा सदस्य झाला आणि दुसऱ्याच सामन्यात 116 धावांची वादळी खेळी केली. पण, त्याला संपूर्ण सत्रात केवळ 243 धावा करता आल्या आणि जमैकन संघ गुणतालिकेत तळाला राहिला.
सेंट ल्युसिया संघाला साखळी गटात गाशा गुंडाळावा लागला. सेंट ल्युसिया संघानं डॅरेन सॅमीला कायम राखले आहे आणि त्याच्याकडे नेतृत्व सोपवले आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम गेलच्या नावावर आहे.''सेंट ल्युसिया आणि कर्णधार म्हणून माझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे युनिव्हर्स बॉस आमच्या संघात आला आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज संघात आल्यानं युवा खेळाडूंना फायदा होणार आहे,''असे सॅमी म्हणाला.
CPL चा यंदाचा मोसम 19 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.