T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट प्रेमींना अस्सल मेजवानी मिळाली. ओमाननं आतापर्यंत केवळ ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना जमलेला पराक्रम करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पापुआ न्यू गिनी संघावर १० विकेट्स राखून विजय मिळवला. त्यात दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं जबरदस्त खेळ करताना बांगलादेशवर ६ धावांनी थराराक विजय मिळवत, आश्चर्यकारक निकाल नोंदवला. या सामन्यात स्कॉटलंडच्या ख्रिग ग्रेव्हेसनं ( Chris Greaves ) अष्टपैलू कामगिरी करताना बांगलादेशा धक्का दिला. हाच ग्रेव्हेस काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी बॉयचं काम करत होता आणि त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला.
३१ वर्षीय ग्रेव्हेस क्रिकेटपटू बनण्याआधी पार्सल डिलिव्हरीचं काम करायचा. अॅमेझॉनसाठी तो हे काम करायचा. पण, नशिबानं त्याचं कनेक्शन क्रिकेटशी जोडलं होतं आणि त्यामुळेच संधी मिळताच त्यानं सोनं केलं. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडचे ६ फलंदाज ५३ धावांवर माघारी परतले होते. पण, ख्रिस ग्रेव्हेस आणि मार्क वॅट यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून स्कॉटलंडला ९ बाद १४० धावांचा पल्ला गाठून दिला. ग्रेव्हेसनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा कुटल्या.
त्यानंतर गोलंदाजीत कमाल दाखवताना त्यानं ३ षटकांत १९ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. त्यानं मुस्ताफिजूर रहमान व शाकिब अल हसन या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीबद्दल स्कॉटलंडचा कर्णधार कायले कोएत्झर म्हणाला,''त्याच्या कामगिरीचं आम्हाला आश्चर्य अजिबात वाटलेले नाही. त्याचं कर्तुत्व आम्हाला माहित्येय. त्यानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. काही काळआधी तो अॅमेझॉनमध्ये पार्सल डिलिव्हरी करत होता आणि आता तो बांगलादेशविरुद्धच्या विजयाचा हिरो आहे.''