युवराज सिंगच्या टी 10 लीगमधील फटकेबाजीसाठी आतुर असलेल्या क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलियन फलंदाजानं मंत्रमुग्ध केलं. मराठा अरेबियन्स विरुद्ध टीम अबु धाबी यांच्यातील सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस लीनला तुफान फटकेबाजी करूनही त्याला टी 10 लीगमध्ये पहिला शतकवीर बनण्याच्या मानापासून वंचित रहावे लागले. थोडक्यात त्याला तिहेरी धावांपासून दूर रहावे लागले. पण, त्यानं टी 10 लीगमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर केला. त्याच्या खेळीनं संघाला मोठा विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना संघाला मोठी मजल मारून दिली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अरेबियन्सला चौथ्या षटकात धक्का बसला. हझरतुल्लाह झाजईला ( 12) बेन लॉघनं त्रिफळाचीत केलं. त्यानंतर कर्णधार लीन आणि अॅडम लीथ यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. लीथनं 18 चेंडूंत 4 षटकार खेचून 30 धावा केल्या. नजीबुल्लाह झाद्राननं 5* धावा केल्या. लीन 30 चेंडूंत 9 चौकार व 7 षटकार खेचून 91 धावांवर नाबाद राहिला. त्यानं 303.33च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. या खेळीसह त्यानं 2018मध्ये अॅलेक्स हेल्सनं नोंगवलेला नाबाद 87 धावांचा विक्रम मोडला. दहा षटकांच्या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली.
लीननं 26 चेंडूंत 82 धावा केल्या होत्या आणि अखेरच्या 18 चेंडूंत त्यानं शतकही पूर्ण केलं असतं. पण, त्याला अखेरच्या तीन षटकांत केवळ चार चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याला टी10 मध्ये पहिला शतकवीर होण्याचा मान पटकावता आला नाही. अरेबियन्सनं 10 षटकांत 2 बाद 138 धावा केल्या.
प्रत्युत्तरात अबू धाबी संघाला 3 बाद 114 धावा करता आल्या. त्यांच्याकडून ल्युक राईटनं 25 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 40 धावा केल्या. कर्णधार मोईन अली 11 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 31 धावांत माघारी परतला. लुईस ग्रेगरीनं 14 चेंडूंत नाबाद 23 धावा केल्या.