मुंबई - टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज आणि एकदिवसीय सामन्यात डबल सेंच्युरी आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा फलंदाज विरेंद्र सेहवाग होय. सेहवाग म्हणजे कसोटी सामन्यातही वनडे आणि एकदिवसीय सामन्यातही टी-२० क्रिकेट खेळणारा तडाखेबाज फलंदाज होता. त्यामुळेच, सेहवागच्या फलंदाजीवेळी चाहते टीव्हीसमोर हालतच नसत. या धुव्वादार फलंदाजाची चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला चाहत्यांना आवडायचा. सेहवाग आज ४५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे, त्याला शुभेच्छाही त्याच्या खेळीच्या स्टाईलनेच दिल्या आहेत.
सेहवागला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणि युवराज सिंगने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या फलंदाजीची आठवण करुन दिलीय. सचिनने यापूर्वीही मुलाखतीत सेहवागच्या खेळीचा उल्लेख केला होता. आता, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने पुन्हा सेहवागच्या तडाखेबंद खेळाची आठवण सांगितली आहे. तर, युवराज सिंगनेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शोल चित्रपटाचा उल्लेख केला आहे.
युवराज सिंगने विरेंद्र सेहवागसोबतचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युवराजने शोले चित्रपटातील डायलॉग सेहवागसाठी लिहिला आहे, चुन चुन के मारुंगा... हा डायलॉग म्हणत सेहवागच्या खेळीचं कौतुक केलंय.
दरम्यान, सेहवागने २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण खेळ केला आहे. त्याने, भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये ३७४ सामने खेळले आणि १७,२५३ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा तो टीम इंडियाचा एकमेव खेळाडू आहे.