आयपीएल २०२५ च्या खेळाडूंसाठीच्या लिलावाच्या तारखांची घोषणा झाली आहे. याचबरोबर हा लिलाव भारतात होणार की परदेशात हे देखील स्पष्ट झाले आहे. IPL चे १० संघ ६४१.५ कोटी रुपयेच खर्च करू शकणार आहेत. आतापर्यंत या १० फ्रँचायझींनी आधीचे काही खेळाडू कायम ठेवल्याने त्यांच्यावर त्यांनी ५५८.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूवर आता पैसे मोजतो याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
यंदाचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव भारतात होणार नसून तो सौदी अरेबियाच्या जेद्दाह या शहरात होणार आहे. जेद्दाहच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये हा लिलाव ठेवण्यात आला आहे. हॉटेल शांग्री-लामध्ये खेळाडू आणि इतर लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे आयपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सर्व फ्रँचायझींनी रिटेन खेळाडूंची लिस्ट जारी केली होती. यानंतर आता खेळाडूंना ऑक्शनच्या तारखांची प्रतिक्षा होती. रियाद ऐवजी जेद्दाहची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएल २०२५ साठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी ११६५ खेळाडू भारतीय तर ४०९ खेळाडू हे परदेशी आहेत. एकूण खेळाडूंपैकी एकूण ३२० खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे आहेत.
मेगा लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी मिळून एकूण ५५८.५० कोटी रुपये खर्च करून ४६ खेळाडूंना कायम ठेवले. यामध्ये ३६ खेळाडू भारतीय तर १० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ३६ भारतीयांमध्ये १० अनकॅप्ड खेळाडू देखील आहेत. दहा फ्रँचायझींकडे 204 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 641.5 कोटी रुपये आहेत. या 204 ठिकाणांपैकी 70 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.