महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) त्याच्या ऑल टाईम बेस्ट संघात महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली या स्टार खेळाडूंना स्थान न दिल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच्या या संघात धोनी, कोहली व दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह भारताची वॉल राहुल द्रविड यालाही स्थान न दिलेला पाहायला मिळाले होते. तेंडुलकरच्या संघात ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस आणि सौरव गांगुलीचा समावेश होता. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट आणि गोलंदाजी विभागात हरभजन सिंग, शेन वॉर्न, वासिम अक्रम व ग्लेन मॅकग्रा यांची निवड केली गेली होती.
पण, या बातमीत आता ट्विस्ट आले आहे. सचिन तेंडुलकरच्या नावानं प्रसिद्ध झालेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, वासिम अक्रम, हरभनज सिंग व ग्रेन मॅकग्रा हे खेळाडू होते. पण, सचिन तेंडुलकरनं अशी कोणतीच ऑल टाइम बेस्ट प्लेइंग इलेव्हन प्रसिद्ध केलेली नाही, असे त्याच्या टीमकडून कळवण्यात आले आहे.
त्याच्या SRT sports management pvt ltd नं म्हटले की,''सचिन तेंडुलकरच्या ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या पाहायला मिळत आहेत. पण, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, हे वृत्त चुकीचे आहे. सचिन तेंडुलकरनं अशी कोणतीच प्लेइंग इलेव्हन निवडलेली नाही.''