दुबई : क्रिकेट सुरुवातीला फक्त मनोरंजनासाठी खेळला जायचा. पण कालांतराने त्यामध्ये व्यावसायिकपणा आहे. त्यानंतर जिंकण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती पाहायला मिळाली. काहींनी तर पैशांसाठी फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा चुकीचा मार्ग निवडला. या गोष्टींची कीड आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएललाही लागली होती. पण टी टेन लीगमध्ये स्वच्छ क्रिकेट पाहायला मिळणार असल्याची ग्वाही आयोजकांनी दिली आहे.
श्रीलंकेचा क्रिकेटपटू दिलहारा लोकोहीटिगेवर काही दिवसांपूर्वी अमिराती क्रिकेट मंडळाच्या पथकाने कारवाई केली होती. त्याने मॅच फिक्संग करण्यासाठी काही गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.
याबाबत टी टेन लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल अरविंदर सिंग यांनी याबाबत सांगितले आहे की, " क्रिकेट या खेळाची प्रतिमा स्वच्छ असायला हवी, असे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसीच्या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे या लीगमध्ये कोणतेही वाईट कृत्य आम्ही खपवून घेणार नाही. जर कुणाकडून चुक झाली तर ती आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही त्याच्यावर त्वरीत कडक कारवाई करू. वाईट लोकांना आम्ही या लीगपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आयसीसीचे भ्रष्टाचार निर्मुलन पथक आम्हाला यावेळी मदत करणार आहे. "