पोशेफ्स्ट्रम : सलग २ एकदिवसीय सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ अखेरच्या सामन्यातही बाजी मारून, यजमान दक्षिण आफ्रिकेला क्लीनस्विप देण्याच्या प्रयत्नात शनिवारी खेळेल. द.आफ्रिकेच्या महिलांपुढे अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल.
गतवर्षी महिला विश्वचषक स्पर्धेत द. आफ्रिकेने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, आता घरच्या मैदानावर भारताचा सामना करणे त्यांना अवघड जात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीयांनी यजमानांना अनुक्रमे १२५ आणि १२४ धावांत गुंडाळले होते. तसेच फलंदाजांनी द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. गोलंदाजांमध्ये अनुभवी आणि दिग्गज झूलन गोस्वामीने पहिल्या लढतीत यजमानांना जखडवून ठेवल्यानंतर, दुसºया लढतीत लेगस्पिनर पूनम यादवने यजमानांची फिरकी घेतली होती. (वृत्तसंस्था)
फलंदाजी फॉममध्ये
फलंदाजीमध्ये सलामीवीर स्मृती मानधनाने पहिल्या दोन्ही सामन्यांत शानदार फलंदाजी करत, द.आफ्रिका गोलंदाजांवर वर्चस्व राखले. दरम्यान, मानधनाची साथीदार पूनम राऊतला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले असले, तरी अखेरच्या सामन्यात तिची बॅट तळपली, तर यजमानांची अवस्था आणखी बिकट होईल.
पहिल्या दोन सामन्यांतील चुका टाळून आपली छाप पाडण्यास ती उत्सुक असेल. त्याच वेळी हा सामना केवळ औपचारिकता म्हणून शिल्लक राहिला असल्याने, युवा फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिला अंतिम संघात स्थान मिळणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
धडाकेबाज हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर, दुसºया लढतीत आक्रमक फलंदाजी करताना आपला हिसका दाखविला होता. त्यामुळे भारताची फलंदाजी फॉर्ममध्ये आहे.
यजमान द. आफ्रिका संघ अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यास उत्सुक आहेत. सलामीवीर लिजेले ली हिचा अपवाद वगळता, अन्य कोणत्याही फलंदाजाला भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यात यश आलेले नाही. त्याचबरोबर, गोलंदाजही सपशेल अपयशी ठरले असून, आतापर्यंत त्यांनी मालिकेत धावांची खैरात केली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दक्षिण आफ्रिका महिला : डेन वॉन नीकर्क (कर्णधार), मेरिजेन काप, तृषा चेट्टी, शबनम इस्माइल, अयाबोंगा खाका, मसाबाता क्लास, सुन लूस, लॉरा डब्ल्यू, मिगनोन डु प्रीज, लिजेले ली, सी. ट्रायोन, अँड्री स्टेन, रेइसिबे एन. आणि जिंटल माली.
भारत महिला : मिताली राज (कर्णधार), तान्या भाटिया, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, मोना मेशराम, शिखा पांडे, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.
Web Title: Cleanliness of India; Host Challenge of Africa's reputation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.