मुंबई : सध्याच्या घडीला रिषभ पंत हा सातत्याने फ्लॉप होताना दिसत आहे. त्यामुळे आता पंतला वगळून महेंद्रसिंग धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहे. खासकरून धोनीचे चाहत्यांनी तर यासाठी सपाटाच लावलेला आपल्याला दिसतो. पण दुसरीकडे निवड समितीच्या मनात दुसरीच गोष्ट घर करून आहे. त्यामुळे धोनीला निवृत्ती घेण्याचे स्पष्ट संकेत निवड समितीने दिल्याचे समजते आहे.
विश्वचषकानंतर धोनी भारतीय आर्मीबरोबर सराव करण्यासाठी जम्मू आणि काश्मीमध्ये गेला होता. विश्वचषकात धोनीच्या कामगिरीविषयी बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती स्वीकारेल, असेही काही जणांना वाटत होते. पण धोनीने नेहमीप्रमाणे या चर्चेला पूर्णविराम देत धक्का दिला. धोनी जम्मू आणि काश्मीरमध्ये असल्यामुळे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी धोनीच्या नावाचा विचार झाला नाही. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर भारतीय संघाने दमदार विजय मिळवले. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून आता भारतीय संघाने संधबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतून धोनीला वगळण्यात आले. ही प्रक्रीया विश्वचषकापूर्वीच सुरु झाली होती. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याला ट्वेन्टी-20 संघातही स्थान मिळेल, असे वाटत नाही. आता फक्त एकदिवसीय क्रिकेटचा पर्याय धोनीसमोर खुला आहे. पण निवड समितीने पंतची जागा घेण्यासाठी ज्या खेळाडूंची नावे घेतली आहेत, त्यामध्ये धोनीचे नाव दिसत नाही.
धोनीचा पर्याय म्हणून निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने रिषभ पंतचा पर्याय निवडला होता. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यांमध्ये पंतऐवजी धोनीलाच पसंती दिली गेली. विश्वचषकात धोनी यष्टीरक्षण करत असला तरी चौथ्या क्रमांकासाठी संघ व्यवस्थापनाने पंतचाच विचार केला होता. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पंतला संधी देण्यात आली होती. पण पंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने नापास होत गेला. भरपूर संधी मिळूनही पंत फक्त धोनीची नक्कल करण्यात मग्न होता. बऱ्याचदा तो संघाला गरज असताना चुकीचे फटके मारून बाद झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे आता पंतसाठी पर्यायी खेळाडूंचा विचार निवड समिती करत आहे. पंतसाठी पर्यायी खेळाडू कोण असतील, हेदेखील निवड समितीने स्पष्ट केले आहे. ज्यामध्ये धोनीचे नाव दिसत नाही.
पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये संधी देण्यात येईल, पण यामध्ये तो नापास ठरला तर निवड समिती संजू सॅमसन आणि इशान किशन यांचा पर्यायी खेळाडू म्हणून विचार करत आहे. यामध्ये धोनीच्या नावाचा उल्लेख करणेही निवड समितीने टाळले आहे. हा निवड समितीने धोनीला दिलेला स्पष्ट संकेत आहे. धोनीने जर या स्पष्ट संकेताकडे दुर्लक्ष केले, तर त्याची निवृत्ती मैदानात होणार नाही, असे वाटते. पण धोनीने जर या संकेतांकडे गंभीरपणे पाहिले तर धोनीसाठीही निवृत्तीच्या सामन्याचे आयोजन केले जाऊ शकते. पण आता धोनीच्या निवृत्तीची घटका समीप आली आहे, हे मात्र नक्की.