लंडन - क्रिकेट हा 'जंटलमन्स गेम' म्हणून ओळखला जातो... तरीही या खेळाला डाग लागण्याचे प्रकार घडलेले आहेत. पण, बुधवारी लंडन येथील समरसेट क्रिकेट लीगमध्ये असा प्रकार घडला, त्यावर राग व्यक्त करावा की हसून लोटपोट व्हावे हेच कळेनासे झाले आहे. लीगमधील एका सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजाला शतक करता येऊ नये यासाठी गोलंदाजाने क्रिकेट इतिहासात कधी न घडलेला प्रताप केला. या कृत्याची गंभीर दखल घेत समरसेट क्रिकेट क्लबने त्या गोलंदाजाला नऊ सामन्यासाठी निलंबित केले आहे.
माईनहेड क्रिकेट क्लब आणि पर्नेल क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यात माईनहेडच्या जय डॅरेलचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले. डॅरेल 98 धावांवर खेळत होता आणि माईनहेडला विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पर्नेलच्या गोलंदाजाने चेंडू त्याच्या दिशेन टाकण्याएवजी थेट सीमा रेषेबाहेर फेकला. या कृत्याने माईनहेडचा विजय पक्का झाला, परंतु डॅरेलला पहिल्या शतकापासून वंचित राहावे लागले. पर्नेलच्या कर्णधाराने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.
माईनहेडने ट्विट केले की,'जे घडले ते चुकीचे होते, परंतु त्यामुळे डॅरेलच्या खेळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गोलंदाजाच्या चुकीवर पर्नेलच्या कर्णधाराने मागितलेल्या माफीचा आदर करायला हवा.'