लंडन : एका बाजूला क्रिकेट विश्वात धावांचा पाऊस पडत असताना, इंग्लंडनं आठवड्यापूर्वी 50 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 481 धावा चोपून काढल्या असताना दुसरीकडे नॉर्थम्प्टनशायरच्या क्लब सामन्यात विकेट्सचा पाऊस पडला आहे. गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवल्यानं पीटरबरो क्लबनं संस्मरणीय विजय मिळवला. पीटरबरोच्या गोलंदाजांनी अवघी 1 धाव देत वायकोंब क्रिकेट क्लबच्या 7 फलंदाजांना तंबूत धाडलं आणि अक्षरश: सामना खेचून आणला. ईएसपीएनक्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार वायकोंबसमोर पीटरबरोनं 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना वायकोंबनं चांगली फलंदाजी केली. वायकोंब संघ विजयापासून केवळ तीन धावा दूर होता आणि त्यांचे सात फलंदाज शिल्लक होते. मात्र इथूनच सामना फिरला. पीटरबरोचा वेगवान गोलंदाज केरन जोन्सनं चार चेंडूंमध्ये चार फलंदाजांना माघारी धाडलं. विशेष म्हणजे त्यानं हे षटक निर्धाव टाकलं. यानंतर शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी 16 वर्षांचा ऑफ स्पिनर डॅनियल मलिककडे होती. यावेळी 57 धावांवर नाबाद असलेल्या नॅथन हॉक्सवर वायकोंबच्या सर्व आशा अवलंबून होत्या. हॉक्सनं पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. मात्र यानंतरचे सर्व फलंदाज हजेरीवीर ठरले. मलिकनं उरलेल्या तीन फलंदाजांना बाद घेत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे पीटरबरोनं ईसीबी नॅषनल क्लब चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विकेट्सचा पाऊस... 11 चेंडू, 1 धाव अन् तब्बल 7 फलंदाज माघारी
विकेट्सचा पाऊस... 11 चेंडू, 1 धाव अन् तब्बल 7 फलंदाज माघारी
विजयासाठी अवघ्या 3 धावा आवश्यक असताना फलंदाज ढेपाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 9:45 PM