Join us

'वर्ल्ड चॅम्पियन' लेकींचा मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार, महिला U19 T20 विश्वचषकात मारली बाजी

भारतीय महिला अंडर-१९ संघाचा विजय अभिमानास्पद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:24 IST

Open in App

CM Devendra Fadnavis felicitates Maharashtra Girls in Indian Cricket team : भेदक गोलंदाजी आणि माफक लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताच्या लेकींनी मलेशियामध्ये झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्सनी मात केली. याबरोबरच भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र भारतीय मुलींनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना खेळपट्टीवर फारसा तग धरता आला नाही. भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघाने २०२५ च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा आज मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राची सानिका विनोद चाळके (फलंदाज आणि उपकर्णधार), भाविका मनोजकुमार अहिरे (फलंदाज आणि विकेटकिपर) आणि ईश्वरी मोरेश्वर अवसरे (ऑलराउंडर) यांनी आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाला यश मिळवून दिले. या खेळाडूंच्या अतुलनीय योगदानाबद्दल आज मंत्रालयात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्याशी संवाद साधला. सानिका, भाविका आणि ईश्वरी यांनी केलेली कामगिरी ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. महिला क्रिकेटला उज्ज्वल भवितव्य आहे, आणि या मुलींनी त्याची सुरुवात भक्कम पायावर केली आहे. महाराष्ट्र सरकार त्यांना भविष्यात आवश्यक सर्व सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असून, विशेषतः महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलमहिला टी-२० क्रिकेटमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस