नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानानंतर भारतीय संघातील खेळाडूंना वागण्या-बोलण्याचे धडे शिकवण्याचा प्रस्ताव प्रशासकीय समितीने ठेवला आहे. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील पांड्याच्या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पांड्यासह राहुललाही निलंबित केले. हे प्रकरण आता न्यायालयात गेले असून त्याला निकाल लवकरच अपेक्षित आहे. वरिष्ठ खेळाडूंसह सर्व वयोगटातील संघांना आणि भारताच्या A संघातील खेळाडूंनाही हे धडे गिरवावे लागणार आहेत.
पांड्या व राहुल यांच्यासाठी लिंग संवेदनशीलतेचे वेगळे सत्र भरवण्यात येणार का, यावर अधिकाऱ्याकडून नकारात्मक उत्तर मिळाले. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानानंतर पांड्या व राहुल यांच्यावर नेटिझन्स चांगलेच भडकले. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. '' पांड्या व राहुल यांच्यासाठी वेगळे सत्र भरवण्यात येणार नाही. भारताचे सर्व खेळाडू या सत्राला उपस्थित राहतील आणि ते दोघेही त्यांच्यासोबत असतील,'' अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली. बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही पांड्या व राहुल प्रकरणानंतर युवा खेळाडूंना लिंग संवेदनशीलतेचे महत्त्व सांगण्यासाठी सत्र भरवावे, अशी मागणी केली होती.
वरिष्ठ खेळाडूं सध्या दौऱ्यात व्यग्र आहेत आणि त्यामुळे ते सर्व सत्रांना उपस्थित राहु शकत नाही. हे सत्र 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या अधिक फायद्याचे ठरले आहे. एका माजी क्रिकेटपटूने सांगितले की,''17 वर्षीय प्रभ सिमरन सिंग ( किंग्ज इलेव्हन पंजाब 4.8 कोटी) आणि प्रयास राय बर्मन ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 1.6 कोटी) हे खेळाडू एकही रणजी सामना न खेळता कोट्याधीश झाले. अशा वेळी त्यांच्या डोक्यात हवा जाऊ नये, यासाठी त्यांचा मार्गदर्शनाची गरज आहे.''