कराची, दि. 17 - पाकिस्तान क्रिकेट टीमचा खेळाडू उमर अकमलने खळबळजनक खुलासा केला आहे. अकमलने पाकिस्तान क्रिकेट टिमचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी मला शिव्या हासडल्या आणि अत्यंत उद्धट भाषेत ते माझ्याशी बोलले असा आरोप त्याने केला आहे. संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक आणि मुश्ताक अहमद हे या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत असंही तो म्हणाला आहे. काय म्हणाला उमर अकमल - अकमल गुडघ्याच्या दुखापतीवर इंग्लंडला उपचार करून परतल्यावर हा प्रकार घडला. देशात परतल्यानंतर प्रशिक्षणासाठी तो क्रिकेट अकादमीत गेला असता फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर याच्याकडे सराव करू देण्याची विनंती केली. पण त्यांनी मला परवानगी नाकारली. बोर्डासोबत करारबद्ध असलेल्या खेळाडूंनाच येथे परवानगी आहे असं ते म्हणाले. त्यामुळे मी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याकडे गलो. त्यांनी मला इंझमाम उल हक आणि मुश्ताक अहमद यांच्याशी बोलण्यास सांगितलं. त्या दोघांशी फिटनेसबाबत बोलणं झाल्यावर मी पुन्हा आर्थर यांच्याकडे गेलो असता त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी मला सर्वांसमोर शिव्या हासडायला सुरूवात केली. अकादमीत खेळण्यापेक्षा जाऊन क्लब सामने खेळ अशा शब्दात त्यांनी मला सुनावलं. त्यावेळी त्यांना कोणीही रोखलं नाही ते माझ्याशी अत्यंत उद्धट भाषेत बोलत होते. दुसरीकडे आर्थर यांनी अकमलचे आरोप फेटाळले आहेत. अकमल खोटं बोलतोय त्याने स्वतःच्या स्वभावात बदल करावा आणि फिटनेस सुधरवावं असं ते म्हणाले. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही उमर अकमलला डच्चू देण्यात आला होता. त्याच्याजागी हॅरिस सोहेलची संघात वर्णी लागली होती.
आणखी वाचा - (पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलचा लाजिरवाणा विक्रम)