नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आगामी टी-20 विश्वचषकातून (T20 World Cup 2022) बाहेर झाला आहे, अशा बातम्या मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. क्रिकेट वर्तुळातील अनेक मंडळींनी यावर आपापल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अशातच आता भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक मोठे विधान केले आहे. जसप्रीत बुमराह केवळ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे, आगामी विश्वचषकातून अधिकृतपणे तो बाहेर झाला नसल्याचे द्रविड यांनी म्हटले आहे.
जसप्रीत बुमराह सध्या BCCI च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे. बुमराहने अलीकडेच दुखापतीतून पुनरागमन करून ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका खेळली होती. मात्र त्याला मालिकेतील पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.
बुमराह अद्याप अधिकृतपणे बाहेर झाला नाही - द्रविड दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्याच्या एकदिवस आधी राहुल द्रविड यांनी गुवाहाटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, "तुम्हा सर्वांना माहीत आहे की, बुमराह अधिकृतपणे टी-20 विश्वचषकातून बाहेर नाही. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. आम्ही देखील अधिकृतपणे याच्या पुष्टीकरणाची वाट पाहत आहोत. त्यामुळे सध्या तो केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर आहे. पुढच्या काही दिवसात काय होऊ शकते ते पाहू. आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती मिळताच आम्ही ती तुमच्यासोबत शेअर करू."
शुक्रवारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील बुमराह अद्याप विश्वचषकातून बाहेर झाला नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे जसप्रीत बुमराहबद्दल अद्याप सस्पेंस कायम आहे. लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांचा टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना