कोलंबो : भारताच्या नवोदित क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या संघाने मंगळवारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून बाजी मारत भारताचा पराभव केवळ टाळला नाही, तर संघाला विजयीही केले. संघाच्या या लढवय्या खेळाने खुश झालेले प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना शाबासकी देत म्हटले की, ‘तुम्ही चॅम्पियन संघाप्रमाणे बाजी पलटवत विजय मिळवला.’
श्रीलंकेच्या २७५ धावांचा पाठलाग करताना भारताची एकवेळ ७ बाद १९३ धावा, अशी अवस्था झाली होती. सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्याने भारताचा पराभव स्पष्ट दिसत होता. मात्र, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी जबरदस्त संयम दाखवताना अखेरपर्यंत हार न मानता नाबाद ८४ धावांची भागीदारी करत भारताचा दमदार विजय साकारला.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये द्रविड ड्रेसिंग रूममध्ये आपल्या खेळाडूंचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘निकालाच्या दृष्टीने आपण अपेक्षित कामगिरी केली; पण हा विजय अविश्वसनीय आणि शानदार ठरला. जरी आपण पराभूत झालो असतो, तरी सामन्यात केलेला संघर्ष शानदार ठरला असता. सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला.’
द्रविड म्हणाले, ‘श्रीलंका संघ पुनरागमन करेल, याची आपल्याला कल्पना होती. त्यांचा आपल्याला सन्मान करायला पाहिजे आणि तेही एक आंतरराष्ट्रीय संघ असल्याने त्यांच्याकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. आपल्या खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला.’ दीपक चहरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक केले. त्याने भुवीसोबत चांगली भागीदारी केली. यावर द्रविड म्हणाले की, ‘वैयक्तिक खेळावर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. नक्कीच सामन्यात काही शानदार वैयक्तिक प्रदर्शन पाहण्यास मिळाले. विशेष करून सामन्याच्या अंतिम क्षणी. या सामन्यात प्रत्येक खेळाडूचे योगदान राहिले आहे. गोलंदाजीतही संघाची कामगिरी शानदार ठरली.’