Join us  

प्रशिक्षकांची फळी तयार करावी - व्हीव्हीएस लक्ष्मण

भारतीय क्रिकेट नियाकम मंडळाने (बीसीसीआय) आधारभूत ढाचा तयार करण्यावर लक्ष देण्याऐवजी चांगल्या प्रशिक्षकांची फळी तयार करण्यावर विचार करावा असा सल्ला क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) दिला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:27 AM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियाकम मंडळाने (बीसीसीआय) आधारभूत ढाचा तयार करण्यावर लक्ष देण्याऐवजी चांगल्या प्रशिक्षकांची फळी तयार करण्यावर विचार करावा असा सल्ला क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) दिला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने दिली.मुंबईत पार पडलेल्या सीआयआय क्रीडा संम्मेलनामध्ये लक्ष्मण उपस्थिती होता. यावेळी, १७ वर्षांखालील फीफा प्रकल्प संचालक जॉय भट्टाचार्य, सीआयआय क्रीडा सम्मेलनाचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अयाझ मेमन, सीआयआयचे विभागीय संचालकडॉ. सौगत मुखर्जी, सीआयआयचे राष्ट्रीय समितीचे सीईओ दीप मुखर्जी आणि सीआयआयचे पश्चिम विभाग अध्यक्ष निनाद करपे यांचीही उपस्थिती होती. यावेळी लक्ष्मणने सांगितले की, ‘ज्यांनी कपिलदेव सारखा महान खेळाडू शोधून घडवला त्या देशप्रेम आझाद यांना आपण कधीच महत्त्व दिले नाही. यानंतर जेव्हा कधी कोणता खेळाडू प्रथम श्रेणी किंवा उच्च स्तरावर खेळतो तेव्हा तो परिपक्व होतो.’ त्याचप्रमाणे लक्ष्मणने यावेळी सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे उदाहरण देताना सांगितले की, ‘खेळाडूच्या कारकिर्दीमध्ये पायाभूत सुविधांपेक्षा अधिक महत्त्वाचे प्रशिक्षक किंवा मेंटॉर असतात. सचिनसारख्या शानदार फलंदाजाला शिवाजी पार्कने नाही, तर आचरेकर यांनी तयार केले आहे.’बीसीसीआयच्या ‘सीएसी’ समितीमध्ये लक्ष्मणसह माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. लक्ष्मणने पुढे म्हटले की, ‘माझ्या मते पायाभूत सुविधांच्या तुलनेत अधिक महत्त्व प्रशिक्षकांचा स्तर उंचावण्याकडे दिले गेल पाहिजे. यासंबंधी आम्ही बीसीसीआयलाही कळवले आहे. मी खूप भाग्यशाली राहिलो, कारण माझ्यातील गुणवत्ता माझ्या मामाने अचूकपणे हेरली. ते माझे मेंटॉर होते. माझ्यातील गुणवत्ता हेरुन मामाने माझ्या आई-वडिलांना विश्वास दिला की, मी उच्च स्तराचे क्रिकेट खेळू शकतो. किती मुलांना अशा प्रकारची संधी मिळते? मला अकादमीमध्ये खूप चांगले प्रशिक्षक मिळाले, याबाबत मी नशीबवान ठरलो.’भारतीय क्रीडा क्षेत्र बदलत आहे....भारतातील क्रीडा क्षेत्र हळूहळू प्रगती करत आहे. त्याचवेळी प्रमुख खेळांनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठी झेप घेतल्याचे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सीआयआय संम्मेलनामध्ये मांडले.क्रीडा क्षेत्राने भारतात सध्या खूप प्रगती केली आहे. त्याचवेळी, क्रिकेट जरी देशातील अव्वल किंवा महत्त्वाचा खेळ राहिला असला, तरी इतर खेळांनीही शानदार कामगिरी करत लोकांचे लक्ष वेधून घेतले.फुटबॉल, हॉकी, कबड्डी सारख्या अनेक खेळांच्या लीग सुरु झाल्या आणि यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचे रुप पालटले. यामुळे खेळाडूंना आपले गुणवत्ता सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच मिळाला. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनाही आपल्या आवडत्या खेळांची इंत्यभूत माहिती घेण्याची संधी मिळाली, असेही मान्यवरांनी सांगितले. 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ