नवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच या नात्याने कार्यकाळाविषयी कुठलाही पश्चात्ताप नाही. तथापि याची अखेर आणखी उत्कृष्ट होऊ शकली असती,’असे मत माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.
कर्णधार विराट कोहली याच्याशी मतभेद होताच २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळे पदावरुन पायउतार झाले होते. झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू पॉमी मबांग्वॉ याच्यासोबत आॅनलाईन सत्रात बोलताना माजी फिरकीपटू कुंबळे म्हणाले,‘आम्ही वर्षभरात बरीच प्रगती साधली होती. यात योगदान देता आले याचा मला आनंद आहे. प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची अखेर आणखी चांगली करता आली असती, मात्र जे झाले ते ठीक आहे. वर्षभरात मोलाची भूमिका बजावू शकलो याचे समाधान आहे.’
कुंबळे यांच्या कार्यकाळात संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली होती. कसोटीतही बरीच झेप घेतली. त्यांच्या कार्यकाळात १७ पैकी एक कसोटी गमावली. याविषयी १३२ कसोटीत ६१९ तसेच २७१ वन डेत ३३७ बळी घेणारे कुंबळे म्हणाले,‘भारतीय कोच म्हणून भूमिका बजावल्याचा मला आनंद वाटतो. वर्षभराचा खेळाडूंसोबतचा सहवास शानदार होता. उत्कृष्ट खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुममध्ये अनुभव शेअर करणे मजेदार ठरले.’ कुंबळे सध्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे मुख्य कोच आहेत. (वृत्तसंस्था)