Join us  

खेळाडूंसाठी आचारसंहिता आणखी कडक होणार

चेंडू कुरतडरणे आणि शेरेबाजी यासारख्या गुन्ह्याच्या शिक्षेत दुरुस्ती करण्याचे संकेत आयसीसी सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी दिले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:42 AM

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेचा आढावा घेण्याची तयारी करीत आहे. चेंडू कुरतडरणे आणि शेरेबाजी यासारख्या गुन्ह्याच्या शिक्षेत दुरुस्ती करण्याचे संकेत आयसीसी सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी दिले.केपटाऊन कसोटीत चेंडू कुरतडण्याचा प्रकार घडल्यापासून आयसीसी खेळाडूंच्या आचार संहितेत कठोर नियम समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात रिचर्डसन म्हणाले, ‘लवकरच आम्ही आचारसंहितेत दुरुस्ती करणार आहोत. नवे नियम लवकरच लागू होतील. खेळाडूंमध्ये सन्मान राखण्याची संस्कृती रुजविण्यावर भर दिला जाईल.’

त्याचप्रमाणे, ‘चेंडू कुरतडणे किंवा मैदानावर अपशब्दांचा वापर होणे हे गंभीर गुन्हे आहेत. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वेळीच पावले उचलून आपल्या दोषी खेळाडूंना शिक्षा दिली. आयसीसी देखील अशा गुन्ह्यात किती कठोर शिक्षा द्यायची याचा आढावा घेणार आहे,’ अशी माहितीही रिचर्डसन यांनी यावेळी दिली.  

मैदानावर खेळाडूंच्या वाईट वागणुकीसाठी लाल किंवा पिवळ्या कार्डचा वापर करण्याची कुठलीही योजना नसल्याचे रिचर्डसन यांनी स्पष्ट केले. क्रिकेटचे नियम बनविणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने अशा प्रकारचे कार्ड देण्याचे समर्थन केले होते.  याबाबात रिचर्डसन म्हणाले,‘ आम्हाला अनेकांनी सूचना केल्या आहेत. लाल आणि पिवळ्या कार्डच्या वापरावर आयसीसीत दीर्घ चर्चा झाली. तथापि यामुळे शिस्त आणण्यास मदत होईल, असे वाटत नाही.’

टॅग्स :चेंडूशी छेडछाडआयसीसी