मुंबई : योगायोग असे काही घडतात, की ते समजणं, त्यांचा अर्थ लावणं बऱ्याचदा सोपं नसतं. पण हे योगायोग आपली उत्सुकता वाढवणारे नक्कीच असतात. आता वेस्ट इंडिजचा अखेरचा विजय आणि भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवचा जन्म यांच्यामध्ये नेमका काय योगायोग आहे, या गोष्टीचा विचार तुम्ही करत असाल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत बरेच दौरे झाले. पण वेस्ट इंडिजच्या संघाने गेल्या किती दौऱ्यामध्ये भारतातसामना जिंकला नाही, हे तुमच्या गावीही नसेल. वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
वेस्ट इंडिजचा संघ 1994 सालानंतर आठ कसोटी सामने भारतामध्ये खेळला. पण या एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. वेस्ट इंडिजने जेव्हा हा विजय मिळवला तेव्हा पृथ्वी शॉ आणि रीषभ पंत यांचा जन्मही झाला नव्हता. भारताचा कर्णधार त्यावेळी फक्त सहा वर्षांचा होता. एक अजब योगायोग म्हणजे जेव्हा वेस्ट इंडिजने अखेरचा सामना जिंकला त्यादिवशीच कुलदीपचा जन्म झाला होता.