SL vs AUS T20, Viral Video: जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतो तेव्हा तो किती उंच जाऊ शकतो? याचा साधारण अंदाज साऱ्यांनाच आहे. बाऊन्सर म्हणजे स्टंपच्या पुढ्यात उभ्या असलेल्या फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाणं. पण ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी२० सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक चेंडू टाकला, तो त्याचा हातून सुटल्यानंतर जवळपास 3 मीटर उंच गेला. मिचेल स्टार्क हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या हातून सुटलेला चेंडू वेगाने वर गेला आणि फलंदाज, यष्टीरक्षक साऱ्यांना चुकवून थेट सीमारेषेपार गेला. पाहा व्हिडीओ-
श्रीलंकेच्या डावातील १८वे षटक सुरू असताना पाचव्या चेंडूवर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कने चेंडू सोडला आणि तो थेट यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या दिशेने गेला. चेंडू वेड याला पकडता आलाच नाही. पण श्रीलंकेलादेखील चार धावा अतिरिक्त मिळाल्या. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
रिप्लेच्या ग्राफिक्समध्ये या चेंडूची उंची दाखवली ती अंदाजे तीन मीटरपर्यंत उंच असल्याचं दाखवण्यात आलं. तसेच मिचेल स्टार्कने टाकलेल्या इतर चेंडूंपेक्षा तो बराच बाहेर जातानाही दिसला. मिचेल स्टार्क ऑफ कटर चेंडू टाकायचा प्रयत्न करत असल्याने ही अजब गजब गोलंदाजी पाहायला मिळाली.